Sushil Nawal
Media

माध्यम जगतातील द्रोणाचार्य…

जळगाव शहर हे कल्पकतेचे शहर म्हणून नावारुपाला येत असतांना विविध स्तरावरील उच्च अधिकारी, विविध क्षेत्रातील नेतृत्त्वसंपन्न व्यक्तींपासून ते सामान्य व्यक्तींचा प्रयोगशील लोकसहभाग शहराच्या विकासाला पूरक असे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. हे सगळं होत असतांना माध्यमांच्या लेखणीलासुद्धा सलाम! शहरात सकारात्मक वातावरण निर्मिती राहावी यासाठी सर्वच माध्यमे सतत प्रयत्नशील आहेत. प्रत्येक वृत्तपत्र हे ठराविक विषयाचा पाठपुरावा तसेच ‘……. न्यूज इम्पॅक्ट’च्या माध्यमातून शहरात चैतन्य निर्माण होवून सकारात्मक विचारसरणीने शहराचा विकास व्हावा यासाठी धडपडत आहेत.

हे सगळं एका दिवसात घडलं का? तर मुळीच नाही. प्रत्येक सहभागी घटक व माध्यमांची दीर्घकाळ तपश्चर्येचं फळ म्हणूनच आज हे दिसून येत आहे. या तपश्चर्येत तन, मन आणि धनाने सतत प्रशासन, लोकप्रतिनीधी, उद्योजक व व्यापारी या सर्वांना माध्यमांच्या साह्याने एका व्यासपिठावर आणून शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणार्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा आज 51वा वाढदिवस. खरं तर त्यांना माध्यम जगतातील गुरु द्रोणाचार्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शहराचा कायापालट व्हावा म्हणून सतत प्रयत्नशील असणारे सुशीलभाऊ नवाल यांच्या ‘माय सिटी माय ड्रीम’ या उपक्रमांतर्गत गत चार वर्षांपासून विविध उपक्रमांद्वारे शहरात भेडसावणार्या समस्या व त्यावरील उपाय योजना, लोकसहभागाच्या माध्यमातून जनजागृती, ना नफा ना तोटा तत्त्वावर विविध उपक्रम यशस्वी करुन ‘आम्ही जळगावकर’ हा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटविणारे व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख. माध्यम जगतातील गत 21 वर्षांपासून अनेकांना धर्नुधारी अर्जुन व एकलव्य याच द्रोणाचार्यांनी दिलेले आहेत. या द्रोणाचार्यांच्या सेवातत्त्वात कधीही कुणीही रिकाम्या हातांनी परत गेलेले नाही.

थोर समाजसेवक स्वर्गीय शामसुंदरजी नवाल व आदर्शमाता सौ. सुमती नवाल यांचे सुपुत्र. वडीलांच्या छत्रछायेत, व्यवसाय गुणांसोबतच सामाजिक ऋण व बांधिलकी, एकसंघ, पारिवारीक एक्य, सहकार्यांचे उत्तम नेतृत्त्व सोबतच काळजीवाहू, अफाट निर्णय क्षमता, संघर्षातून यशस्वीतेकडे वाटचाल हे सर्वगुण अंगीकारून त्यात पारंगत असणारे व्यक्तिमत्व. पुणे सिम्बॉयसिस महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर 1986 साली वडीलांच्या पारंपारिक व्यवसायात उतरून परिवाराला हातभार लावण्याचे ठरविले. वडीलांसोबत कार्य करीत असतांना जळगाव शहरातून जगाच्या पाठीवर कापड व्यवसायात नावाजलेले ‘डेविनले फ्रान्स’ या ब्रॅण्डचे संपूर्ण भारतातील कॉर्पोरेट नेटवर्कींग निपुणतेने केले.

शिक्षणापासूनच माध्यम जगतातील ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांची कल्पकता व दूरदृष्टी माध्यमातील विपणनाच्या दिशेकडे त्यांना खुणावत होती. 1997 साली कापड व्यवसाय सोडून माध्यम जगतातील नावाजलेले दैनिक देशदूतचे कार्यकारी संचालक पद त्यांनी स्विकारले. पदावर कार्यरत असतांना माध्यम जगतातील कॉर्पोरेट मीडिया सेल्सच्या जबाबदारी सोबत अॅडमिनिस्ट्रेशन, प्रॉडक्शन, मार्केटिंग, सर्क्युलेशन आणि प्रिंटींग टेक्नोलॉजीचे अनुभवही त्यांनी ज्ञात केले. सुरूवातीपासूनच कल्पक, सतत जगाला वेगळं काही करून दाखविण्याची भावना असलेल्या सुशीलभाऊंच्या वैविध्यपूर्ण कल्पनांनी अवघ्या साडेतीन वर्षांच्या कालखंडात शहरातील अग्रणीय दैनिकाच्या बरोबरीला देशदूतला नेऊन ठेवले व देशदूतच्या वाचकांची मोठी संख्या निर्माण केली. याच दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांसाठी संपूर्ण भारतातील व विविध सामाजिक स्तरावरील महनीय व्यक्तिंसोबत भेटी-गाठीही झाल्यात.

व्यक्तिगत नितीमूल्य ठरविणे सोपे पण आमलात आणणे तेवढेच कठीण. मात्र वडिलांच्या शिकवणीमुळे नितीमूल्यांच्या बाबतीत सुशीलभाऊ मात्र खंबीर. आणि याचीच परिणिती 2001 साली अवघ्या साडे तीन वर्षातच त्यांना व्यवस्थापनाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. त्याकाळी माध्यम जगतात सिस्टीमॅटीक मॅनरमध्ये करण्यासाठी खुपकाही असल्यामुळे, तसेच शहरातील उद्योजक व व्यापार असलेल्या ग्राहकांच्या माध्यमाशी संबंधित गरजा भागविण्यासाठी ‘मीडिया व इव्हेंट सर्व्हीसेस’ एकाच छताखाली देणारी ‘मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि’ ही जाहिरात व इव्हेंट मॅनेजमेंटची स्वत:ची कंपनी सुशीलभाऊंनी सुरू केली.

सतरा वर्षाच्या प्रवासात कमर्शियल कॅम्पेन असो वा पॉलिटीकल कॅम्पेन ग्राहकांच्या रूपयांचे मुल्य जाणून ‘माय कस्टमर रूपी थेअरी’ म्हणजेच ‘ग्राहकाने त्याच्या उत्पादन किंवा प्रचार प्रसिद्धीसाठी गुंतविलेल्या रूपयाचा योग्य परतावा कसा मिळवून देता येईल’ यावर सतत कार्य केले व ते आजही रूजविण्याचे कार्य सुरू आहे. 100 हून अधिक सहकार्यांसोबत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ग्राहकनिती जोपासत जळगाव, औरंगाबाद व धुळे येथे 200हून अधिक स्थानिक व कॉर्पोरेट ग्राहकांना कॉस्ट इफेक्टिव्ह व तत्पर सेवा देण्याचे कार्य सुशीलभाऊ करीत आहेत.

मंदीत संधी असते, मंदीतच दुप्पट व्यवसाय होतो असा ठाम विश्वास असलेले सुशीलभाऊ फक्त बिझनेस म्हणून नव्हे तर मार्केट स्टडी व सर्व्हेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी सदैव मार्केटच्या विविध कॅटेगरीमधील क्लायंटस्ला आजही नियमित भेटी देतात. त्यांच्याशी त्यांच्या व्यवसायासंदर्भात सुसंवाद साधून व्यवसायवाढीसाठी काय प्रयत्न केले पाहिजे या विषयावर चर्चा करतात. संथ असलेल्या मार्केटला गतिमान करणे यासाठी ते सतत धडपडत असतात. ‘खान्देश शॉपिंग फेस्टीवल‘च्या माध्यमातून शहरात 300 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल हे अजून ही जळगावचे व्यावसायिक विसरलेले नाहीत. विविध महाविद्यालयातील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक शिक्षणासोबतच प्रॅक्टीकल नॉलेजही महत्त्वाचे आहे म्हणून आजवर अनेक ‘कमवा व शिका’ सारखे उपक्रम घेवून विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहित करीत आले आहेत. यासाठी वेळोवेळी त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही सुरुच असतात. ‘लेखनी जळगावचा विकास घडवू शकेल काय?’, ’जळगावच्या विकासाला गुरुंची आवश्यकता’ असे समाजोभिमुख उपक्रमासोबतच आपल्या ग्राहकांसाठी.. ग्राहकांच्या व्यवसायवृद्धीसाठी.. नव्याने फ्रँचायझी नेटवर्क सर्व्हिसेस सोबतच डिजीटल व सोशल मीडिया सर्व्हिसेस, पी.आर. व एच.आर. सर्व्हिसेसच्या माध्यमातून तत्पर सेवा देण्याचे त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.

अनेक पुरस्कार आजवर संपादन करणार्या सुशीलभाऊंच्या नेतृत्त्वातच त्यांच्या मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि या संस्थेला लोकमत समुहाकडून 2016-17चा लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवार्ड देण्यात आला. खान्देशातील 1000 विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवन दिल्ली येथे नेवून बालदिन साजरा करून झालेल्या इव्हेंटचे ‘बेस्ट इव्हेंट ऑर्गनॉयझर’ म्हणून रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलिस दलाच्या मदतनिधीसाठी कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनासाठीसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. यातून त्यांच्या कार्यवैशिष्ट्याचा वसा दिसून येतो. ग्राहकाचा व्यवसाय तसेच ग्राहक हा स्टेबल होईस्तव सेवा देणे म्हणजेच आर्थिक भार हा स्वत:वर घेऊन त्यांच्या चेहर्यावर कधीच प्रश्नचिन्ह दिसलेले नाही. नेहमी त्यांना कसे आहात? असे विचारले असता त्यांचे वाक्य ‘कल से आज अच्छा हूँ’ मनावर नक्कीच परिणाम करतात. ग्राहक मोठा होईल तरच आपणही मोठे होणार हा गुरुमंत्र आपल्या सहकार्यांना देण्यासोबतच एखाद्या सहकार्याला ग्राहक सेवेविषयी त्रुटी आढळल्यास त्याला जितके कडकपणे रागवतात तितक्याच प्रेमळ वागणुकीने भविष्यात तो सहकारी ती चूक करणार नाही ही समजूत ही घालतात. ते नेहमी म्हणतात, आपल्या सहकार्यावर विश्वास टाका, विश्वासाला पात्र ठरायचे की नाही हे संबंधित सहकार्याला ठरवायचे आहे. सहकारी घडवितांना प्रेम, जिव्हाळ्याच्या वागणुकीतून वेळ प्रसंगी राग ही व्यक्त करावा लागतो. त्यांचा राग हा संबंधित विषयासाठी असला तरी क्षणातच विरघळतो. कधीही कुणाविषयीही त्यांच्या मनात राग किंवा द्वेष बघण्यात नाही.

नोटबंदी व जीएसटी नंतर मिडीया क्षेत्रात येवू घातलेल्या आवाहनांवर मात करीत डिजीटल युगात डिजीटल व सोशल मीडिया या सेवेची भर आपल्या व्यवसायात घालून आगेकूच करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले सुशीलभाऊ. माध्यम जगतातील एक सुपरिचित, अफाट इच्छाशक्ती, सकारात्मकता नावीन्य व कल्पकतेचा सुयोग्य मेळ असलेले मनमिळावू व्यक्तिमत्व. आपल्या सेवा सुविधांनी सेवा क्षेत्राला नवा आयाम देणार्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाद्वारे आम्हा सर्वांना सतत प्रेरणा मिळत राहील, असे हे माध्यम जगतातील द्रोणाचार्य आज वयाची 51 वर्षे पुर्ण करुन 52व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, त्यांना सुदृढ आरोग्यासह दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

– रत्नेशकुमार पाण्डेय
सिनी. मॅनेजर – ऑपरेशन अॅण्ड सेल्स्
मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि, जळगाव

Share on FacebookTweet about this on TwitterShare on Google+Share on LinkedIn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *